गॉडफादरच्या रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्यांना घरी पाठवा; रोहन खंवटे यांचे म्हापशेकरांना आवाहन

म्हापसा – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सध्या गोव्यात सुरु असून सर्वच पक्ष आता कंबर कसून मैदानात उतरले आहेत. यातच म्हापसा मतदार संघातील लढत देखील रंगतदार बनली असून बहुरंगी लढतीमुळे सर्वांचेच लक्ष या मतदार संघाकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी आमदार जोशुआ डिसुझा यांना पुन्हा एकदा जनतेने निवडून द्यावे असे आवाहन केले आहे.

ते म्हणाले, जोशुआ युवा आहे. आपल्या वडिलांप्रमाणे सर्वांना पुढे घेऊन जात आहे. दुसरे विरोधक उमेदवार आहेत ते स्वतःच्या पाठबळावर किती पुढे जाऊ शकतात? लोकांची कामे किती करू शकतात यावर विचार करावा. आज राजकारण असे झाले आहे की, आपल्या फायद्यासाठी काहीजण इतरत्र जातात. मात्र पुढील १० वर्षे भाजपची सत्ता राज्यात असेल, त्या सत्तेत वाटेकरी होण्यासाठी म्हापसा वासियांनी आमदार जोशुआ यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन रोहन खंवटे यांनी केले.

म्हापसा मतदारसंघाच्या वॉर्ड १८ मध्ये घरोघरी प्रचार संपल्यावर खंवटे बोलत होते. यावेळी आमदार जोशुआ डिसोझा माजी नगरसेवक रोहन कवळेकर, स्वप्नील शिरोडकर, योगेश खेडेकर, उपनगराध्यक्ष शेखर बेनकर, साईनाथ राऊळ आदी उपस्थित होते.

युवा पिढीची आज गरज आहे. गॉडफादरच्या रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्यांना घरी पाठवा आणि तरुण तडफदार जोशुआ यांना निवडून द्या असं ते म्हणाले. फक्त जोशुआच नव्हे तर बार्देशातून सातापैकी सात उमेदवार भाजपचे निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत अन्य राज्यातून आलेल्या पक्षांना हाकलून लावा. असे ते म्हणाले.