रोहित पाटलांपुढे भाजप फेल; खासदारांच्या पॅनेलमधील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Sangali – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (CM Eknath Shinde), भाजपा विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट यांच्यात प्रतिष्ठेची लढाई आहे. दरम्यान, या लढाईत भाजप (BJP) आणि शिंदे गटाची सरशी होताना पाहायला मिळत आहे.

एका बाजूला हे चित्र असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दिवंगत नेते आर. आर. पाटील (R.R.Patil) यांचा मुलगा रोहित पाटील (Rohit Patil) याने राजकारणातील यशस्वी घौडदौड कायम ठेवली आहे. कवठेमहांकाळ नगरपरिषद निवडणुकीनंतर रोहित पाटील याच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने आता तासगांव तालुक्यातील किदरवाडी ग्रामपंचायतीचे मैदान मारले आहे.

ग्रामपंचायतीमधील सर्व ७ जागा जिंकत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता खेचून आणली आहे.इतकंच नाही तर भाजपचे खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांच्या पॅनेलमधील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या विजयानंतर रोहित पाटील यांचे राजकारणातील चालींपुढे भाजपचे दिग्गजही फेल असल्याचे बोलले जात आहे.