महाराष्ट्राला दिल्लीपुढं झुकवण्याचे असंख्य प्रयत्न …; रोहित पवारांचे रडगाणे सुरूच  

मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत  राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर काल झालेल्या सभेत ठाण्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीची चांगलीच धुलाई केली. राज्यात सुरु असलेलं गलिच्छ राजकारण,  मराठा आरक्षण ( Maratha reservation ),ओबीसी आरक्षण ( OBC reservation ), विजेची समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, राष्ट्रवादीचा जातीयवाद, समान नागरी कायदा, भ्रष्टाचार यासह प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली.

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या प्रत्यके नेत्याचा शेलक्या शब्दात ठाकरी शैलीत समाचार घेतला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री छगन भुजबळ, खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचा राज ठाकरेंनी समाचार घेतला. आपल्या भाषणातून ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा अक्षरशः बुरखा फाडला.

दरम्यान, काल झालेल्या राज ठाकरेंच्या एका सभेमुळे संपूर्ण महाविकास आघाडी एकट्या राज ठाकरेंवर तुटून पडली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे, ते म्हणाले, मराठी अस्मिता, मुंबईचा स्वाभिमान, युवकांचा रोजगार हे मराठी मनातील मुद्दे आहेत. याच मुद्द्यांना घेऊन कधीही फायदा तोट्याचा विचार न करता मराठी मनाची भूमिका प्रखरपणे मांडणारे राज ठाकरे साहेब आज भाजपच्या द्वेषमूलक विचारांची तळी उचलत आहेत याचं नक्कीच दुःख आहे. असो!

काही कारणास्तव भूमिका या तात्पुरत्या बदलाव्या लागल्या असतीलही, पण मराठी मनातील अस्मितेची, स्नेहाची भावना मात्र कधीही बदलणार नाही, ही अपेक्षा आहे. महाराष्ट्राला दिल्लीपुढं झुकवण्याचे असंख्य प्रयत्न झाले व होत आहेत, परंतु स्वाभिमानी बाण्याचा महाराष्ट्र ना कधी झुकला.. ना कधी झुकणार.  ‘तोडा-फोडा आणि राज्य करा’ या भाजपच्या ब्रिटिशकालीन रणनीतीला मराठी माणूस ओळखून असल्याने द्वेषमूलक विचारांच्या रणनीतीला महाराष्ट्राचं मराठी मन नक्कीच हद्दपार करेल, हा विश्वास आहे.असं ते म्हणाले.