हीच परंपरा पंढरपूर, देगलूर आणि कोल्हापूरलाही पाळली गेली असती तर… – रोहित पवार

Andheri Bypoll : ३ नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी (Andheri East Bypoll Election) होणाऱ्या पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून स्व. रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके (Rutuj Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल (Murji Latke) यांना उतरवण्यात आले होते. परंतु आज बैठकीनंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार (BJP Withdraws From Andheri Bypoll) असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ज्यानंतर ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या घडामोडींवर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. कर्जत-जामखेडचे आमदार व राष्ट्रवादी नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर अंधेरी पोटनिवडणुकीबाबत लवकर निर्णय झाला असता, तर निवडणूक चिन्हावरून झालेला खटाटोप टाळता आला असता. तसेच राजीनाम्यावरून ऋतुजा लटके यांना झालेला त्रासही उद्भवला नसता, असे रोहित पवार म्हणाले आहेत. शिवाय महाराष्ट्राची राजकीय परंपरा पंढरपूर, देगलूर आणि कोल्हापूरातही पाळली गेली असती, तर बरे झाले असते, अशा शब्दांत टीकाही केली आहे.

त्यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, “महाराष्ट्राच्या वैभवशाली राजकीय परंपरा, संकेत आणि संस्कृतीला साजेसा निर्णय घेत अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे आभार. हीच परंपरा पंढरपूर, देगलूर आणि कोल्हापूरलाही पाळली गेली असती तर अधिक बरं झालं असतं.”

अंधेरी पूर्व संदर्भात लवकर निर्णय झाला असता तर राजीनामा मंजूर करण्यासाठी तसंच चिन्हा संदर्भातही झालेला खटाटोप टाळता आला असता. असो! शेवटी का होईना, जाग आली हे महत्वाचं आहे,” असेही रोहित पवार यांनी म्हटले.