देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावली, रोहित पवार म्हणाले…

मुंबई – राजकीयदृष्ट्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रोखणे अवघड होत असल्याने आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पातळी सोडू लागली आहे का असा सवाल आज नाविलाजाने उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले असताना हा प्रकार घडला आहे. अटल बिहारी वाजपेयी उद्यानात प्रवेश करताना ही धक्कादायक घटना घडली. फडणवीसांचा विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळीच फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली.

दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रोहित पवार ट्विट करत की, ”विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत. पण त्याऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही,” असं रोहित पवार म्हणाले.