Rohit Sharma | ‘एका ऑडिओने माझी वाट लावली’, रोहितने हात जोडून बंद करायला सांगतिला आवाज? व्हिडिओ व्हायरल

रोहित शर्माची (Rohit Sharma) गणना आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. पण आयपीएल 2024 पूर्वी मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले होते. मुंबई संघाचा हा मोसम चांगला गेला नाही आणि हा संघ प्ले ऑफमध्ये जाऊ शकला नाही. मुंबईने शुक्रवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला आणि या सामन्यातील रोहितचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

लखनऊविरुद्धच्या सामन्यात रोहितने (Rohit Sharma) शानदार खेळी केली. त्याने 38 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी केली. मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. लखनऊने हा सामना 18 धावांनी जिंकला. हा मुंबईचा लीगमधील शेवटचा सामना होता ज्यात या संघाला विजय मिळवता आला नाही.

रोहितने हात जोडले
दरम्यान सामन्यानंतर व्हायरल झालेल्या रोहितच्या व्हिडिओमध्ये तो धवल कुलकर्णीशी बोलत होता. मात्र त्यानंतर एक व्यक्ती त्यांचा व्हिडिओ बनवत आहे. रोहित या व्यक्तीकडे पाहतो आणि हात जोडून म्हणतो, “भाऊ, ऑडिओ बंद कर यार. मी हात जोडतो एका ऑडिओने माझी वाट लावली आहे.” यानंतर हा व्हिडिओ संपतो.

काही दिवसांपूर्वी रोहितचा कोलकाता नाईट रायडर्सचे सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रोहित कथितपणे मुंबई संघातील अंतर्गत चर्चा शेअर करत होता आणि म्हणत होता की, पांड्या संघात आल्यानंतर सर्व काही बदलत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप