जाळ अन् धूर संगठच..! न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्मा आणि शुबमन गिलची धुव्वादार शतके

इंदौर| भारतीय क्रिकेट संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि युवा सलामीवीर शुबमन गिल यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात धडाकेबाज शतके ठोकली आहेत. सलामीला फलंदाजीला उतरत दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी २१२ धावांची लक्षणीय भागीदारी झाली. यादरम्यान रोहित आणि गिलने त्यांची वनडेतील शतकेही पूर्ण केली.

रोहित शर्मा ८५ चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०१ धावा करुन बाद झाला. हे रोहितचे वनडेतील तिसावे शतक होते. तर वर्ष २०२३ मधील हे त्याचे पहिले शतक ठरले. रोहितबरोबरच आपल्या झंझावाती खेळीची जादू कायम ठेवत गिलनेही ७२ चेंडूत शतक साजरे केले. हे मागील ४ वनडे डावातील त्याचे तिसरे शतक होते. तर वनडे कारकिर्दीतील हे त्याचे चौथे शतक आहे.

दरम्यान भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले २ सामने जिंकत मालिकेवर कब्जा केला आहे. आता इंदोर येथील तिसरा वऩडे सामना जिंकत भारतीय संघ न्यूझीलंडला ३-० ने मालिकेत क्लिन स्वीप करण्यासाठी प्रयत्नशील असेल.