रागाच्या भरात कर्णधार रोहितकडून भर मैदानात सुंदरला शिवीगाळ, Video व्हायरल

Dhaka| बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाला एका विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी, गोलंदाजी याबरोबरच क्षेत्ररक्षणही सरासरी राहिले. त्यातही सामन्याच्या शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी केवळ एका विकेटची गरज असताना खेळाडूंकडून २ मोठ्या चुका झाल्या. ज्यामुळे कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) पारा चढला. रोहितने दिलेली रिऍक्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

भारतीय संघ विजयापासून फक्त एका विकेटने दूर होता. याचवेळी यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातून बांगलादेशचा फलंदाज मेहिदी हसनचा सोपा झेल सुटला. याच झेलमुळे भारतीय संघाच्या हातून विजय निसटला. राहुलबरोबरच वॉशिंग्टन सुंदरकडूनही एक चूक झाली. बांगलादेशच्या डावातील ४३व्या षटकात ही घटना घडली.

शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर मेहिदी हसनने थर्ड मॅनच्या भागात शॉट मारला. तिथे वॉशिंग्टन सुंदर क्षेत्ररक्षणासाठी उभा होता, परंतु त्याने झेल पकडण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. हे पाहून कर्णधार रोहितला राग आला आणि तो वॉशिंग्टनवर (Rohit Sharma Angry On Washington Sundar) ओरडला. यावेळी रोहितने अपशब्दही वापरले. ज्यामुळे रोहित चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.

वॉशिंग्टनबरोबरच केएल राहुलच्या हातूनही सोपा झेल सुटला. बांगलादेश संघाला विजयासाठी ३१ धावांची गरज असताना यष्टीमागे राहुलच्या हाती सोपा झेल आला होता, परंतु तो हा झेल पकडण्यात अयशस्वी ठरला. हाच झेल सोडणे भारतीय संघाला महागात पडले.