रोहित शर्माच्या टी२० कर्णधारपदाला धोका? बीसीसीआयच्या बैठकीत झाला मोठा निर्णय

वर्षाच्या पहिल्या दिवसापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ( बीसीसीआय, BCCI) ऍक्शन मोडमध्ये असल्याचे दिसत आहे. आज म्हणजेच १ जानेवारी रोजी बीसीसीआयची आढावा बैठक (BCCI Review Meeting) होती. या बैठकीत भारतीय क्रिकेट संघाच्या मागील टी२० विश्वचषकातील कामगिरीवर चर्चा झाली. विश्वचषकातील पराभवानंतर रोहित शर्माकडून (Rohit Sharma) टी२० संघाचे कर्णधारपद हिरावून घेतले जाणार का?, हा सर्वात मोठा प्रश्न होता. यासंदर्भात आजच्या बैठकीत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

रोहितच्या कर्णधारपदाला धोका?
वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या कर्णधारपदाला अजूनतरी कोणताही धोका नाही. कारण माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पारंपारिक फॉरमॅटमध्ये त्याच्या कर्णधारपदात बोर्डाच्या उच्च पदस्थांना काहीही असमाधानकारक आढळले नाही. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीला कर्णधार रोहित, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड उपस्थित होते. या बैठकीला निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा, एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी देखील उपस्थित होते.

विश्वचषकाची तयारी सुरू 
बीसीसीआय सध्या येत्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर संपूर्ण लक्ष्य केंद्रित करत आहे. याशिवाय त्यांच्या रडारवर २०२३मध्ये वनडे विश्वचषकही होणार आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “रोहित वनडे आणि कसोटी संघांचे नेतृत्व योग्यरित्या करत आहे आणि या दोन फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून त्याच्या भविष्याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. कसोटी आणि वनडे सामन्यांमध्ये त्याचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे.” २०२३ च्या विश्वचषकापर्यंत २० खेळाडूंचा समूह फिरवण्याचा निर्णयही घेण्यात आला.

“मात्र बोर्डाने श्रीलंका टी२० मालिकेत टी२० फॉरमॅटची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली आहे. आता तो पुढेही या फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसण्याची दाट शक्यता आहे,” असेही बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले आहे.

आढावा बैठकीत सहभागी झालेले चेतन शर्मा पुन्हा वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष होऊ शकतात. ते अध्यक्ष झाले नाहीत तरी ते उत्तरेकडील विभागाचे प्रतिनिधी होऊ शकतात. माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादचेही नाव दक्षिण विभागासाठी चर्चेत आहे पण त्याची निवड निश्चित झालेली नाही.