इशानसारखंच द्विशतक ठोकल्यानंतरही शुबमन बाकावर बसणार? कर्णधार रोहितने स्वत: दिले संकेत

हैदराबाद- न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाकडून सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याने धडाकेबाज खेळी केली. त्याने २०८ धावांची शानदार द्विशतकी (Shubman Gill Double Century) खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १२ धावांनी पहिला सामना जिंकत वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व इशान किशन या द्विशतकवीरांनी गिलची मुलाखत घेतली. या मजेशीर मुलाखतीचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

भारतीय संघाचा सलामीवीर इशान किशनने (Ishan Kishan) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चट्टोग्राममध्ये १३१ चेंडूत २१० धावांची धडाकेबाज खेळी केली. ज्यामध्ये १० षटकार आणि २४ चौकारांचा समावेश होता. पण या खेळीनंतर पुढच्या 3 सामन्यात इशानला संघातून वगळले गेले. त्याचवेळी रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात रोहितने ईशान किशनला टोमणा मारला.

रोहित (Rohit Sharma) मजेत इशानला म्हणाला, “इशान तू दुहेरी शतक झळकावले, पण त्यानंतर ३ सामने खेळला नाहीस.” यावर डावखुरा फलंदाज इशानने हसून उत्तर दिले की, “भाऊ, तुम्ही कर्णधार आहात. पण यातून मी खूप काही शिकलो.”

विशेष म्हणजे द्विशतक झळकावल्यानंतरही इशान किशनला श्रीलंकेच्या संपूर्ण मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी देण्यात आली नव्हती. अशा परिस्थितीत आता कर्णधार रोहितनेही शुभमनवर निशाणा साधला असून त्यालाही आगामी सामन्यांमधून वगळले जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत.