करमाळा उपजिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी अठरा कोटी रुपये मंजूर

जेऊर : अखेर माजी आमदार नारायण पाटील यांच्या मागणीस व पाठपुराव्यामुळे करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थान इमारत बांधकामासाठी आता 18 कोटी 68 लाख 33 हजार 295 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.शासन निर्णय क्रमांक प्रशामा /2021/ प्र. क्र. 136 /आरोग्य 3 अ नुसार यास अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. माजी आमदार नारायण पाटील यांनी दिनांक 22 /11/2021 रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना एक निवेदन सादर करुन सदर आरोग्य कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी निधीची मागणी केली होती.

याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की आपल्या मागणी व पाठपुराव्यामुळे करमाळा उपजिल्हा रुग्णालयास 50 खाटांवरुन 100 खाटांच्या रुग्णालयात श्रेणीबंध करण्यात आले होते.येथील मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी व सहायक आरोग्य अधिकारी तसेच सर्व कर्मचारी यांच्या निवासस्थानाची खुप गैरसौय होती. उपलब्ध निवासस्थान इमारत ही जीर्ण झालेल्या अवस्थेत असल्याने सदर बांधकाम हे पडझडीच्या अंतिम टप्प्यात आले होते.

इमारतीचे प्लॅस्टर पडू लागले होते. करमाळा तालुक्यातील रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्याची चांगली भक्कम सोय उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून आपण नवीन इमारत बांधकामासाठी मंजुरी व निधीची मागणी केली व यासाठी मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री, बांधकाम मंत्री आणि मुख्य सचीव यांच्या कडे पाठपुरावा केला त्यास आता यश आले असुन करमाळा तालुक्यातील आरोग्य विभागाचा एक महत्त्वाचा प्रश्न सुटला आहे.

आगामी काळात सुध्दा करमाळा मतदार संघातील सर्व विभागातील प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी यावेळी ठामपणे सांगितले.