‘बालिश विधाने करून फक्त स्वतःच हसं करून घेता येतं’, रुपाली चाकणकरांचा शिवसेना आमदाराला टोला

पुणे : साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून जोरदार वाद पेटला आहे. कोरेगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यावरून कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी थेट पवार घरण्यावरच निशाणा साधला आहे. रयतचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे, अशी भूमिका होती. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली,असल्याचा घणाघाती आरोप महेश शिंदे यांनी केलाय.

रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या बॉडीवर घेतलं जातं याचे दुःख वाटत असल्याचे आमदार शिंदे म्हणाले.खासदार उदयनराजे भोसले यांना रयतच्या बॉडीवर घेतले नाही, ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे.राजकीय ताकद असल्याने ही संस्था ताब्यात गेली असून हे चुकीचे आहे. असं महेश शिंदे म्हणाले आहेत.

माझी उंची 6 फूट असून शरद पवारांची उंची माझ्यापेक्षा 2 इंचाने मोठी आहे. पवारांनी वंशपरंपरागतीने पुढील पिढीला रयतचे अध्यक्षपद दिल्यास रयत संस्थेसाठी फार मोठा धोका निर्माण होईल. ज्यांना समाजातील कसलीच जाण नाही अश्यना या संस्थेवर घेतल्याची टीका करत जनतेचा विचार करून पवार साहेब रयतचे अध्यक्षपद सोडतील, असं खोचक वक्तव्य शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केले आहे.

महेश शिंदे यांच्या आरोपांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘जवळपास साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी दीड हजार पेक्षा जास्त कर्मचारी आणि सातशेहून अधिक शाखा असणारा रयतचा परिवार. आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा कार्यभार पवार साहेब गेल्या कित्येक वर्षांपासून अविरतपणे सांभाळत आहेत परंतु पवार साहेबांवर बोला आणि प्रसिद्ध व्हा या तंत्राचा वापर करणारे कित्येक महानुभाव आपण बघतो त्यातले एक म्हणजे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे. पवार साहेबानी रयतचे अध्यक्षपद सोडायला पाहिजे , पवार साहेब माझ्यापेक्षा फक्त दोन इंचाने मोठे आहेत म्हणणाऱ्या आमदार शिंदेंची मला किव येते.’ असा घणाघात चाकणकर यांनी केला आहे.

तर, ‘बरोबरी करायची आहे तर वैचारिक उंचीची करा. असली बालिश विधाने करून फक्त स्वतःच हसं करून घेता येतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना केंद्रीत धरून रयत शिक्षण संस्थेचा विस्तार केला. मुलांना शिक्षण मिळावे म्हणून कष्ट घेतले. त्याच गोष्टींना पुढे घेऊन जाण्याचे काम साहेब करत आहेत.’ असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, ‘आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली रयत शिक्षण संस्थेची यशस्वी वाटचाल कदाचित आपल्याला पाहवत नसेल. पण हा महाराष्ट्राचा सह्याद्री रयत शिक्षण संस्थेला अजून पुढे घेऊन गेल्या शिवाय राहणार नाही हा मला रयतची विद्यार्थीनी म्हणुन विश्वास आहे.’ असं देखील रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.