रूपालीताई स्टंटबाजी नको; संजय राठोडांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दाखवावा

पुणे : राज्य  महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) या केवळ स्टंटबाजी करीत आहेत. त्यांना खरोखरच काम करायचे आहे तर माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दाखवावा,असे आव्हान शिवशक्ती सेना या पक्षाच्या सर्वेसर्वा  करूणा मुंडे (Karuna Munde) यांनी काल दिले.

मुंडे म्हणाल्या, ‘‘ट्विट करून स्टंटबाजी करण्यापेक्षा संजय राठोडसारख्या राजकारण्यांवर कारवाई करण्याचे धाडस चाकणकर यांनी दाखविले पाहिजे. माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तरच शक्ती कायदा आंमलात आल्याचे लोकांना समजेल.महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून संजय राठोड यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे यासाठी चाकणकर यांनी पुढाकार घेतला पाहिजे.’’ सरकारनामाने याबाबत वृत्त दिले आहे.

पुढे त्या म्हणाल्या, सामाजिक न्यायमंत्री पती धनंजय मुंडे यांच्यासोबत आपले भांडण वेगळे आहे, अभी पिक्चर बाकी है. मी बऱ्याच यातना सहन केल्या असून, मला अद्याप न्याय मिळालेला नाही. जेव्हा माझे पती मला म्हणतील की मी हरलो तू जिंकली, तो माझ्यासाठी न्याय असेल.वेळ आली तर परळीत नवरा विरूद्ध बायको अशी लढत होईल, असं म्हणत करूणा मुंडे यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशामुळे धनंजय मुंडे यांच्याविरोधात काही बोलणार नाही. न्यायालयाची स्थगिती उठेल त्यादिवशी मुंबईत पत्रकार परिषद घेउन आपल्यावरील अन्याय जनतेला सांगू. महिलांवरील अन्यायाबाबत कोणीही आवाज उठवत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले नेते आहेत, परंतु त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा. तरच, शक्ती कायदा अस्तित्वात आला असे आपण समजू,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.