रशियाचा युक्रेनमधील विमानतळांवर बॉम्बहल्ला; प्रत्युत्तरात रशियाची विमाने पाडल्याचा युक्रेनचा दावा 

नवी दिल्ली – युक्रेन प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक सुरू असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पूर्व युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे.  रशियानं युक्रेनच्या कीव बोरीस्पिल, निकोलायव्ह, क्रॅमतोर्स्क, खेरसन यासह अनेक विमानतळांवर बॉम्बहल्ला केला आहे.

दुसरीकडे युक्रेननं हार मानणार नसल्याचं म्हटलं आहे. लुहान्स्क भागात रशियाची पाच विमाने (Russian planes) आणि एक रशियन हेलिकॉप्टर (Russian helicopter) पाडण्यात आल्याचं युक्रेनच्या लष्करानं म्हटलं आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियाने क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. युक्रेनमधील ओडेसा येथील ब्लॅक सी बंदरात स्फोट झाल्याची माहिती एएफपीनं दिली आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन दरम्यान भडकलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 1,461 अंकांची घसरण झाली. निर्देशांक 55,770 अंकांवर घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 430 अंकांची घट झाली. निर्देशांक 16,633 अंकांवर कोसळला आहे.