रशियानं यूक्रेनच्या जवळ सैन्य तैनात केल्यामुळं तणाव वाढला; बायडन यांनी रशियाला दिला निर्वाणीचा इशारा

नवी दिल्ली- रशियानं यूक्रेनच्या जवळ सैन्य तैनात केल्यामुळं निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चर्चेच्या अधिक फेऱ्या घेण्यास संमती दिली आहे. 7 डिसेंबर रोजी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या दोन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रशियन सरकारनं दिली आहे.

रशियानं यूक्रेनवर हल्ला केला तर त्यांच्यावर कडक आर्थिक आणि इतर निर्बंध लादण्याचा इशारा यावेळी ज्यो बायडन यांनी पुतीन यांना दिला तर पुतीन यांनी नाटो कराराचा विस्तार आणखी पूर्वेकडे होणार नाही याची हमी देण्याची मागणी दिली.

दरम्यान रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यास रशियाला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल आणि मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा जी-7 राष्ट्रांनी दिला आहे. मात्र यूक्रेनवर हल्ला करण्याचा रशियाचा बेत नसल्याचं क्रेमलिननं म्हटलं आहे.