भले शाब्बास! ऋतुराज गायकवाडचा विश्वविक्रम, एकाच षटकात ठोकले सलग ७ सिक्स

अहमदाबाद: विजय हजारे ट्रॉफीतील महाराष्ट्र क्रिकेट संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने धडाकेबाज द्विशतक (Double Century) झळकावले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश संघात दुसरा उपांत्यपूर्व सामना पार पडला. या सामन्यात महाराष्ट्राकडून कर्णधार ऋतुराजने आतिशी खेळी केली. उत्तर प्रदेश संघाच्या गोलंदाजांचा घाम काढत त्याने शानदार द्विशतक ठोकले. यादरम्यान एका षटकात सलग ७ षटकार ठोकत त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्र संघाने निर्धारित ५० षटकात ५ बाद ३३० धावा केल्या. यातील अर्ध्यापेक्षा जास्त धावा एकट्या ऋतुराजने कुटल्या. १५९ चेंडूंचा सामना करताना १६ खणखणीत षटकार आणि १० चौकार मारत तो २२० धावांवर नाबाद राहिला.

यादरम्यान ४९ व्या षटकात ऋतुराजचा रुद्रावतार पाहायला मिळाला. शिवा सिंगच्या या षटकात सलग ७ षटकारांसह त्याने ४३ धावा ओढल्या. या षटकातील पहिल्या सलग ४ चेंडूंवर त्याने षटकार मारले. त्यानंतर पाचवा चेंडू नो बॉल होता, ज्यावर फ्रि हिटचा फायदा घेत ऋतुराजने आणखी एक षटकार मारला. मग पुढील सलग २ चेंडूवर पुन्हा एकदा त्याने षटकार ठोकले. अशाप्रकारे एकाच षटकात ७ षटकार मारण्याचा अद्वितीय विश्वविक्रम ऋतुराजने केला आहे.