मोदी शहांचे लांगूलचालन करण्यासाठी माता पित्यांना शिव्या घालणारे हे ढोंगी हिंदूत्ववादी ओळखा- सावंत

Mumbai – भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एक वेळ आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना शिव्या दिलेल्या सहन करणार नाही, असं चंद्रकांत म्हणाले. पुणे भाजपाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाच्या भाषणात ते बोलत होते. या वक्तव्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनीही चंद्रकांत यांच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत यांनी आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, असे म्हणत हिंदू धर्माची शिकवण धुळीस मिळवली असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. गणेश देवाचे उदाहरण देत त्यांनी आई-वडिलांचे महत्त्वही पटवून दिले आहे. शिवाय त्यांनी चंद्रकांत यांना ढोंगी हिंदूत्त्ववादी असे म्हणत टीका केली आहे. ट्वीट करत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘मातृ देवो भव पितृ देवो भव’ हिंदू धर्माची शिकवण! ‘सर्वतीर्थमयी माता सर्वदेवमय: पिता’ पद्मपुराण सांगते. माता पिता हेच विश्व गणरायाने शिवपार्वतींची प्रदक्षिणा करून कार्तिकेयास समजावले. मोदी शहांचे लांगूलचालन करण्यासाठी माता पित्यांना शिव्या घालू पाहणारे हे ढोंगी हिंदूत्ववादी ओळखा, असे सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.

चंद्रकांत पाटील यांचे संपूर्ण वक्तव्य
आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघातली निवडणूक आणि त्यावेळी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांविषयी भाष्य केलं. “हातकणंगल्यात रोज उठून राजू शेट्टी मोदींना शिव्या द्यायचे. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. म्हटलं तुम्ही चूक करताय. परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि त्यांची भेट झाल्यानंतर ते म्हणाले की दादांनी मला संपवलं.”

“ते केंद्रीय नेते ४० वर्ष माझ्याशी जोडलेले असल्याने म्हणाले की दादा कोणाला संपवत नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण दादा (चंद्रकांत पाटील) मोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.