अतुल लोंढे यांना बढती दिल्याने सचिन सावंत नाराज? काँग्रेस प्रवक्तेपदाचा दिला राजीनामा

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्यांवर नाराज होऊन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. अतुल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद दिल्याने सचिन सावंत यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सचिन सावंत हे गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. मधल्या काळात त्यांना विधानपरिषदेवरही पाठवणार असल्याची चर्चा होती. काँग्रेसची नेमकी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि भाजपला सडेतोड उत्तर देण्याचं कामही ते करत होते. शिवाय पक्ष चर्चेत ठेवण्याचंही काम त्यांनी केलं होतं. मात्र, आज झालेल्या नियुक्त्यांमध्ये त्यांना डावलून अतूल लोंढे यांना मुख्य प्रवक्ते पद देण्यात आलं. त्यामुळे सावंत नाराज झाले असून या नाराजीतून त्यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिल्याचं सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून अतुल लोंढे यांच्याकडे मुख्य प्रवक्ते पदाची व डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रदेश काँग्रेसच्या कामात सुसुत्रता व वेग यावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची रचना करून नवनियुक्त पदाधिका-यांना जबाबदारीचे वाटप केले आहे. माध्यम आणि संवाद विभागाची तसेच मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अतुल लोंढे यांच्याकडे सोपवण्यात आली असून सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आणि जाकीर अहमद यांचाही या समितीत समावेश आहे.

अध्यक्ष व मान्यवरांच्या दौ-याच्या नियोजनाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. तर सोशल मीडिया विभागाचा प्रभार प्रदेश सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांच्याकडे देण्यात आला आहे. आघाडी संघटना, विभाग व सेल या विभागाच्या प्रमुखपदी माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनिल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर हे सहप्रमुख असतील. तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आ. अभिजीत वंजारी हे सहप्रमुख व प्रदेश सरचिटणीस माजी आ. दिप्ती चवधरी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, सहप्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम व सदस्यपदी विश्वजीत हाप्पे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षण विभागाच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रामहरी रूपनवर, सहप्रमुखपदी, शाम उमाळकर, संजय बालगुडे, यांची व सदस्यपदी डॉ. हेमलता पाटील आणि जयश्री शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजकीय कार्यक्रमाच्या नियोजन समिती प्रमुखपदी माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, सदस्यपदी सुर्यकांत पाटील व प्रशांत गावंडे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षांनी केली आहे. बुथ विस्तार समितीच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष हरिष पवार, सदस्यपदी प्रदेश सचिव सचिन साठे व नंदा म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही पहा: