Karthik Aryan | दु:खद! अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा घाटकोपर होर्डिंग अपघातात मृत्यू

Karthik Aryan | मुंबईत नुकत्याच झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले. यादरम्यान मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग पडून अनेकांचा मृत्यू झाला. त्यात बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या नातेवाईकांचीही नावे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता अपघाताच्या ५६ तासांनंतर कार्तिक आर्यनच्या मामा आणि मामीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. यावर अभिनेता कार्तिक आर्यनकडून (Karthik Aryan) अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सूत्रांवर विश्वास ठेवला तर, अभिनेत्याचे मामा मनोज चांसोरिया, जे इंदूर विमानतळाचे माजी संचालक होते, ते पत्नी अनिता चांसोरियासोबत मुंबईला गेले होते. ते जबलपूर येथील सिव्हिल लाइन्स येथे राहत होते आणि काही महत्त्वाच्या कामानिमित्त मुंबईला गेले होते. आपल्या मुलाला भेटण्यासाठी ते अमेरिकेला जाण्याच्या तयारीत होते. ते काही दिवस मुंबईत राहण्यासाठी आले होते आणि त्यांना परत मध्य प्रदेशात जावे लागणार होते. मात्र मुलगा यशला आई-वडिलांशी बोलता येत नसल्याने त्याने नातेवाइकांची मदत घेतली. यानंतर त्याचे आई-वडील मुंबईतील वादळात अडकल्याचे त्याला समजले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असता ५६ तासांनंतर त्यांचे मृतदेह सापडले.

या प्रकरणात, प्राधिकरणाकडून असे सांगण्यात आले की, कार्तिक आर्यनच्या मामाचा फोन ट्रेस केला असता, त्यांचे शेवटचे लोकेशन पेट्रोल पंपाजवळ आढळले. त्यावेळी हा अपघात झाला असावा आणि दोघांचाही मृत्यू झाला असावा, असे बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. कारण या प्रकरणात मिळालेले शेवटचे दोन मृतदेह हे मनोज आणि अनिता यांचे आहेत. या प्रकरणाबाबत बोलायचे झाले तर या अपघाताच्या ६० तासांनंतर १६ जणांना आपला जीव गमवावा लागला असून ७५ जण जखमी झाले आहेत. आता ज्या ठिकाणी हा अपघात झाला ती जागा सील करून पुढील तपास सुरू केला जाईल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप