शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याची खंत- अॅड. यशोमती ठाकूर

मुंबई – आज ८ मार्च रोजी आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Women’s Day) निमित्ताने सर्व महिला आमदारांना आपल्या मतदारसंघातील प्रश्न उपस्थित करण्याची संधी सभागृहात उपलब्ध करुन देण्यात आली होती. यावेळी माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी विविध मुद्यांना हात घालत सरकारला चांगलेचे धारेवर धरले. आघाडी सरकारच्या काळात दोन महिला कॅबिनेट मंत्री होत्या तर आमची एक बहिण सभापती होती. मात्र गेल्या आठ महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्य़ा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याची खंत अॅड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) यांनी बोलून दाखवली.

महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. मात्र आत्ताच्या सरकारमध्ये एकही महिलेचा समावेश नसल्याचे पाहायला मिळत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. किमान महिला व बालकल्याण खाते तरी आमच्या महिला भगिनीला देण्यात यावे, अशी मागणी ठाकूर यांनी सभागृहात केली. खऱ्या अर्थाने सरकारचा कारभार शेवटच्या माणसापर्यंत पोहचला पाहिजे, असे काम आघाडी सरकारने केले असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. सध्याचे जे महिला धोरण राबविले जात आहे. ते आमच्या काळातील असल्याचे ठाकूर यावेळी म्हणाल्या. जोपर्यंत महिला धोरणाच्या अंमलबजावणीवर भर दिला जात नाही, तोपर्यत या धोरणांचा काहीही उपयोग नसल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही तीन टक्के रक्कम ही अर्थखात्यात आणि डिपीटीसीमध्ये प्रामुख्याने महिला व बालकल्याण विभागासाठी राखून ठेवली होती. ती आत्ताच्या सरकारनेही राखून ठेवली पाहिजे अशी मागणी ठाकूर यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बालकल्याण विभाग आणि या विभागासाठी तीन टक्के राखीव निधी ठेवणार का? असा प्रश्न सुद्धा ठाकूर यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे राज्यात महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण हे १५ टक्क्यांनी वाढलेले असल्याची माहिती अॅड. यशोमती ठाकूर यांनी सभागृहासमोर ठेवली. तसेच ठाकूर यांनी सभागृहात आपली व्यथा सुद्धा मांडली. स्त्रियांना अक्कल नसेत असे बोलले जाते, मात्र आज माझी ही तिसरी टर्म आहे. मी इथे आमदार म्हणून बोलत आहे. पण आजही विधानसभेत तो भेदभाव पाहायला मिळत असल्याचे अॅड. यशोमती ठाकूर यांनी सभागृहात सांगितले.

आम्हाला इथे येण्यासाठी पुरुषांपेक्षांही अधिक संघर्ष करावा लागतो. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. पुरुषांना आमदार होण्यासाठी जितका संघर्ष करावा लागत नाही, त्यापेक्षा खुप जास्त संघर्ष आम्हा महिलांना करावा लागत असल्याचे ठाकूर यांनी यावेळी सांगितेल. महिलेला एखाद्या विषयावर बोलायचे असेल तर तिला बोलता आले पाहिजे. घरच्या घरी निर्णय घेतानाही आपण किती काळ संपत्तीचे अधिकार आणले असल्याचे ठाकूर यांनी सांगत आजही सातबारावर एका महिलेला आपले नाव लावता येत नसल्याची खंत ठाकूर यांनी बोलून दाखवली. राज्यात महिला धोरण राबवताना प्रत्येक दोन किलोमीटर अंतरावर स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे. आणि तशी सक्ती असायला हवी, तसेच त्याची अंमलबजावणी सुद्धा कठोरपणे व्हायला हवी, असे मत अॅड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

महिलांचा आर्थिक विकास सुद्धा होणे गरजेचे असल्याचे मत ठाकूर यांनी व्यक्त केले. महिलांना कौशल्य विकासाचे ज्ञान आणि प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे सुद्धा ठाकूर यांनी यावेळी नमूद केले. राज्यातील महिला व बालकल्याण विभागाकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. वरील विविध विषयांवर आज अॅड. यशोमती ठाकूर यांनी आठ महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या शिंद-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.