‘शाळा बंद आणि बार सुरू… म्हणजे सरकारला ‘क्लास पेक्षा ग्लास’ महत्त्वाचा वाटतो’ 

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यामधल्या पहिली ते नववी इयत्तेपर्यंतच्या सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अकरावीचे वर्गही 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाइन पद्धतीनं सुरू राहणार आहे.

दरम्यान, एका बाजूला शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जात असताना दुसऱ्या बाजूला दारूची दुकाने, बिअर बार हे मात्र चालूच राहणार आहेत. नेमका हाच मुद्दा पकडून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. ते म्हणाले, शाळा बंद आणि बार सुरू.. म्हणजे या महाभकास आघाडी सरकारला’क्लास पेक्षा ग्लास’  महत्त्वाचा वाटतो… वाह रे वाह ठाकरे सरकार… असं म्हणत खोत यांनी ठाकरे सरकारला चिमटा काढला आहे.

दरम्यान, राज्यात काल दिवसभरात 40925 नवीन कोरोनाबाधीतांची नोंद झाली. विषाणू संसर्गाचा वेग जास्त असला तरी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलं आहे. राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 1 लाख 41 हजार 492 झाली असून त्यापैकी 91731 रुग्ण मुंबईतले आहेत. त्यापाठोपाठ 22510 रुग्ण ठाण्यातले आहेत. राज्यात काल 14256 कोरोना रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.8 शतांश टक्के झालं आहे. दिवसभरात काल 20 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.