‘हिजाब आणि बुरखा घालून फिरणाऱ्या इतर राज्यात आपण आपली मुलगी पाठवणार आहात का?’

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे असलेले श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी (22 मार्च) दुपारी ईडीकडून कारवाई करण्यात आली. पाटणकर यांची अंदाजे साडेसहा कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यात ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 फ्लॅट्स जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारवाईनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेतेमंडळींनी प्रतिक्रिया दिल्या.

‘श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे बंधू असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे मी आता माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही,’ असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानाचा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘हा जिजाऊ आणि शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आमच्या मुली इथेच मोठया होतील. हिजाब आणि बुरखा घालून फिरणाऱ्या इतर राज्यात आपण आपली मुलगी पाठवणार आहात का?’ असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.