आतातरी राजू शेट्टी शरद पवारांच्या माडीवरुन खाली उतरणार की नाही, सदाभाऊंचा टोला

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले.

या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत केली जाणार असून ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

या तोकड्या मदतीवरून आता राज्याचे माजी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ऐट राजाची, वागणूक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला आहे. लवकरच मी सरकार विरोधात किसान परिषद घेणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही परिषद घेणार आहे, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांचा देखील समाचार घेतला आहे. शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली नाही तर जलसमाधी घेईन, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिली होता. यावर सदाभाऊंनी राजू शेट्टींना निशाण्यावर घेताना जलसमाधी नको किमान अंघोळ तरी करा, असा टोला लगावला. तर आतातरी शरद पवारांच्या माडीवरुन खाली उतरणार की नाही, असा खोचक सवालही विचारला.

हे देखील पहा