पवारसाहेबांवर बोलण्याइतपत सदाभाऊ खोतांची लायकी नाही – राष्ट्रवादी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री सदाभाऊ खोत विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला असल्याचे दिसून येत आहे. खासदार शरद पवार आणि राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या खोत यांच्यावर राष्ट्रवादीकडून टीका करण्यात आली आहे. सत्तेपासून उपाशी असलेल्या सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते बरळू लागले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे.

सदाभाऊ खोतांचे ‘उपाशी खोत’ असंच नामकरण करण्याची गरज आहे. भाजपच्या वळचणीला येऊन सत्तेत मंत्रीपद भोगलेले सदाभाऊ खोत यांना सत्ता गेल्यानंतर काहीच सुचेनासे झाले आहे असा टोलाही क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे.

आदरणीय शरद पवारसाहेब महाविकास आघाडीचे प्रणेते ठरल्यानेच सदाभाऊ खोत पवारसाहेबांवर बरळू लागले आहेत. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत मात्र त्यांची पवारसाहेबांवर बोलण्याइतपत लायकी नाही हे पहिले लक्षात ठेवावे असा स्पष्ट इशाराही क्लाईड क्रास्टो यांनी दिला आहे.