मोठी बातमी : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला अटक 

मुंबई– राजकीय क्षेत्रातून एक अत्यंत संतापजनक घटना पुढे आली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, शितल म्हात्रे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांच्यासह इतर तिघांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या पाच आरोपींपैकी चार जण ठाकरे गटाचे तर एक जण काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार,  विनायक डायरे या 27 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली असून रवींद्र चौधरी यांनी विनायक डावरेला व्हिडिओ व्हायरल करायला दिला असल्याची माहिती आहे. विनायक डावरे मातोश्री पेज ऑपरेट करत होता. शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याच्या प्रकरणात ठाकरे गटाच्या युवासेनेचे कोअर कमिटीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनाही पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र  म्हणून साईनाथ दुर्गे यांची ओळख आहे. साईनाथ दुर्गे बीएमसीच्या शिक्षण समितीचे माजी सदस्यही आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज शीतल म्हात्रे यांच्यासाठी विशेष संदेश दिला आहे. एखादी महिला प्रगती करत असेल. तिला थांबवता येत नसेल तेव्हा अशा प्रकारच्या विकृतींद्वारे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. पण शीतल म्हात्रे यांनी हिंमतीने लढावं, आम्ही सगळ्या तुझ्या पाठिशी आहोत, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली आहे.