“कोश्यारी महाराष्ट्रद्रोही, शिवाजीद्रोही..!”, राज्यपालांवर भडकले संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे

औरंगाबाद: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शिवाजी महाराज हे तर महाराष्ट्राचे जुने आदर्श असून नितीन गडकरी सध्याचे आदर्श आहेत, असे विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल  कोश्यारी बोलत होते.

राज्यपालांच्या या विधानावर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.

“राज्यपाल महाराष्ट्रद्रोही आहेत, हे माहिती होते. परंतु ते शिवाजी द्रोहीदेखील आहे, हे आज माहिती पडले. छत्रपती शिवाजी महाराज कधीही जुने होणार नाहीत. ते नेहमी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या नसानसात जिवंत राहतील. राज्यपाल फक्त सकाळी झोपेतून उठतात आणि जीभ टाळूला मारतात. अशा वाचाळवीरांची जीभ बंद झाली पाहिजे,” अशा शब्दांत संतोष शिंदे यांनी राज्यपालांना सुनावले आहे.

काय म्हणाले राज्यपाल?
“छत्रपती शिवाजी महाराज हे तर जुने युगाचे आदर्श आहेत. लोकांना आज महाराष्ट्रातच त्यांचे नवे आदर्श सापडतील. ते बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते नितीत गडकरी आणि शरद पवार असू शकतात”, असे विधान कोश्यारी यांनी दिले आहे.