समीर वानखेडेंना मोठा दिलासा, नवाब मलिक पडले तोंडघशी

Mumbai – एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना आणखी एका प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने समीर वानखेडे हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचा निर्वाळा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासह इतरांनी समीर वानखेडे यांच्यावर इतर बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता.

समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचे सांगत नोकरी मिळवली, वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे ही नोकरी मिळवली असल्याचा आरोप मलिक यांनी याआधी केला होता. तर, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हे आरोप फेटाळून लावत मुस्लिम नसून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असल्याचा दावा केला होता.

दरम्यान, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम नसल्याचे या समितीने म्हटले. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्मामध्ये विधीवत धर्मांतर केले नसल्याचे समितीने म्हटले. समीर वानखेडे यांचे वाडवडील हे हिंदू धर्मीय अनुसूचित जातीतील असल्याचे सिद्ध होत असल्याचेही जातपडताळणी समितीने म्हटले. समीर वानखेडे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याने ही तक्रार फेटाळून लावण्यात येत असल्याचे जात पडताळणी समितीने म्हटले.