मुंबई महानगरपालिकेच्या दस्ताऐवजामध्ये खाडाखोड करुन १९९३ साली समीर वानखेडे यांनी दस्ताऐवज बदलले – मलिक

मुंबई – समीर वानखेडे याने मुंबई महानगरपालिकेच्या दस्ताऐवजामध्ये खाडाखोड करुन १९९३ साली दस्ताऐवज बदलले. तेथील रजिस्टर देखील गहाळ केले. पण त्यांना हे माहीत नव्हते की, महापालिकेने ते दस्ताऐवज स्कॅन करुन ठेवले होते. आज ते महानगरपालिकेचा संगणकीय दाखला दाखवत आहेत. आम्ही महापालिकेचे मुळ कागदपत्रे माननीय कोर्टासमोर ठेवणार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा आता हळुहळु समोर येतोय. एक आयपीएस अधिकारी जे समीर वानखेडे यांचे शेजारी होते. त्यांच्यासोबत वानखेडेंचा काही वाद झाल्यानंतर त्यांच्या मुलांना २७ अ च्या अंतर्गत फसविण्यात आले. मुलाने जामीन अर्जात सांगितले गेले की, एनसीबीचा कोणताही अधिकारी घरात आला नव्हता असे असताना मुलाला बाहेर बोलविण्यात आले आणि खोटे प्रकरण दाखवून अटक करण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

ज्या मुलाला फसविण्यात आले त्याचे वडील आयपीएस अधिकारी आहेत. जर काही कुरबुर झाली तर खोटे प्रकरण दाखल करुन तुरुंगात टाकण्याची धमकी समीर दाऊद वानखेडे दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

ज्या मुलीला समीर वानखेडेने घटस्फोट दिला होता. ती मुलगी आपल्याविरोधात कधीही उभी राहू शकते, या भीतीपोटी मुलीच्या चुलत भावाकडे एका ड्रग्ज पेडलरकडून ड्रग्ज ठेवून फसविण्यात आले. राज्याचा अमलीपदार्थ विरोधी पथकामार्फत मुलीच्या भावाला अटक करण्यात आली. तसेच आमच्याविरोधात साक्ष दिली तर पुर्ण कुटुंबाला ड्रग्ज पेडलर बनवून तुरुंगात टाकू, अशी धमकी देण्यात आली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

वानखेडे यांच्या वडिलांनी माझ्यावर सव्वा कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. ट्विट करण्यापासून रोखावे, अशीही मागणी त्यांनी कोर्टापुढे केली. मुख्य याचिकेवर नंतर सुनावणी होईलच. हायकोर्टात याबाबतीत सुनावणी झाली होती. आमदार आणि एका पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता असल्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन पाहायला हवे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले होते. यानंतर आम्ही या प्रकरणात आणखी खोलात जाण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिकेचे सर्व रेकॉर्ड आम्ही तपासले. वानखेडे यांच्या शाळेत दाखल केल्यापासून शाळा सोडल्याच्या दाखल्यापर्यंत सर्व कागदपत्रे आम्ही गोळा केली आहेत. हायकोर्टाच्या न्यायाधीशांसमोर हे कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत.

हायकोर्टाने याचिकाकर्त्यांनाही हे कागदपत्रे देण्यास सांगितले आहे. आज दुपारी २ वाजता हायकोर्टाचे न्यायाधीश दोन्ही पार्ट्यांना समोरासमोर बसवून याची सुनावणी घेतील. तसेच माझ्या ट्विट करण्यावर जी बंदीची मागणी केली होती, त्यावर सुनावणी होईल. त्यानंतर सव्वा कोटीच्या दाव्याबाबत सुनावणी करण्यात येईल असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

वाझे आणि परमबीरसिंह यांनी मुंबईमध्ये खंडणीचा धंदा सुरु केला होता. तसेच अँटीलियासमोर बॉम्ब प्लँट करुन जे काही केले ते सरकारला अंधारात ठेवून केले गेले. विधानसभेत जेव्हा प्रश्न आला तेव्हादेखील मुंबई आयुक्तांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली. सगळी माहिती समोर आल्यानंतर आयुक्ताची बदली करण्यात आली. बदलीनंतर हे प्रकरण पुढे जाईल आणि तपास सुरु होईल हे कळल्यानंतर भाजपच्या मदतीने अनिल देशमुख यांच्याविरोधात ईमेलद्वारे तक्रार करण्यात आली.

या तक्रारीनंतर काही लोकांनी सीबीआयमार्फत याचा एफआयआर दाखल करुन घेतला. एफआयआर दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. पवारसाहेबांनी काल हे स्पष्ट केले की, तुम्ही कितीही आम्हाला त्रास द्या. जे काही तुम्ही करत आहात, त्याचे उत्तर आम्ही देऊ. देशमुखसाहेबांना अडकविण्यासाठी फर्जीवाडा करण्यात आला आहे. जो तक्रारदार आहे, तोच आता फरार झालेला आहे. हे लोक पाहत आहेत. आज ना उद्या यातील सत्यता कोर्टाच्या समोर येईल असेही नवाब मलिक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.