समीर वानखेडे-क्रांती रेडकरच्या घरात चोरी; वाचा कुणावर आहे संशय

मुंबई – एनसीबीचे (NCB) माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Sameer Wankhede And Kranti Redkar) या दाम्पत्याच्या घरी चोरी (Home Theft) झाली आहे. घरातील काम करणाऱ्या महिलेनेचं चोरी केल्याचा आरोप क्रांतीने केला आहे. याबाबत गोरेगाव पोलीस स्थानकात (Goregaon Police Station) तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारीनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या घरातून जवळपास साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेचा यात समावेश आहे. चोरी झाल्याचं उघडकीस येताच घरातील काम करणारी महिला गायब असून तिनेच हात साफ केल्याचा आरोप क्रांतीने केला आहे.

क्रांतीने काही दिवसांपूर्वीच एका एजन्सीच्या माध्यमातून घर कामासाठी एका महिलेला कामावर घेतलं होतं. क्रांतीच्या तक्रारीनंतर पोलीस सध्या याच एजन्सीमध्ये संबंधित महिलेबद्दल चौकशी करत आहेत. सोबतच या कंपनीची देखील चौकशी सुरु आहे.