मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर समीर वानखेडे यांना NCB मध्ये आणण्यात आलं. त्यानंतर ते सातत्याने बॉलिवूडच्या मागे लागले आहेत. कोरोना काळात जेव्हा अख्खं बॉलिवूड मालदिवमध्ये होतं तेव्हाच समीर वानखेडेही तिथे होते. त्यांचे कुटुंबीय होते. समीर वानखेडे तिथे खंडणी वसुलीसाठी गेले होते. समीर वानखेडे हे दुबईला का गेले होते याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यांनी आर्यन खान विरोधात उभी केलेली केस हा बनाव आहे. जाणीवपूर्वक बॉलिवूडला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं जातं आहे’ असे आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले होते.
या आरोपांना आता समीर वानखेडे यांनी अतिशय आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. ‘वारंवार गेल्या 15 दिवसांपासून माझी मृत आई, माझे निवृत्त वडील आणि बहिणीवर घाण शब्दांमध्ये टीका केली जात आहे. मी या गोष्टीचं खंडन करतो. ते खूप मोठे मंत्री आहेत. त्यांना लोकांचा अपमान करण्याचा कदाचित अधिकार असू शकतो. पण मी खूप लहान सरकारी कर्मचारी आहे. मी माझं काम करतोय. जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अँटीड्रग्ज ऑपरेशन करण्यावरुन जेलमध्ये टाकत असतील तर मी त्याचं स्वागत करतो’, अशी आक्रमक भूमिका समीर वानखेडे यांनी मांडली आहे.
‘खंडणी हा खूप घाणेरडा आणि खालच्या पातळीचा शब्द आहे. मी मालदीवला गेलो होतो. मी माझ्या वरिष्ठांची, सरकारची परवानगी घेऊन आपल्या मुलांसोबत गेलो होतो. त्याला तुम्ही खंडणी म्हणत होते, हे चुकीचे आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मी एक छोटा सरकारी कर्मचारी आहे. ते खूप मोठे मंत्री आहेत. देशसेवा करण्यावरुन, ड्रग्ज हटवण्यावरुन ते मला जेलमध्ये टाकत असतील तर मी त्यांचं स्वागत करतो’, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
‘मी एनसीबीत येण्यासाठी 2019 मध्ये अर्ज केला होता. जेव्हा ड्रग्ज प्रकरण माझ्याकडे नव्हतं. त्यांची केस एक वर्षापासून सुरु होती. ते जे कनेक्शन लावत आहेत त्याची मी कठोर शब्दांत निंदा करतो’, अशी रोखठोक भूमिका समीर वानखेडे यांनी मांडली.
हे देखील पहा
https://www.youtube.com/watch?v=C5UJi3yGjzU