‘आज संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे’

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आज सायंकाळी सभा होणार आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला ८ जून रोजी ३७ वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने होणाऱ्या ‘हिंदुत्वाचा हुंकार’ या घोषवाक्यासह मुख्यमंत्र्यांच्या सभेचा जोरदार प्रचार केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त शिवसेना मोठ्या ताकदीने शक्तिप्रदर्शन करणार आहे. खासदार संजय राऊत, मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, नेते चंद्रकांत खैरे (MP Sanjay Raut, Minister Aditya Thackeray, Guardian Minister Subhash Desai, Legislative Council Deputy Speaker Nilam Gorhe, Leader Chandrakant Khaire) यांच्यासह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरात १० हजार भगवे ध्वज, २०० होर्डिंग, स्वागत बॅनर, चौकाचौकांत सर्वत्र भगवे ध्वज फडकविण्यात आले आहेत.

दरम्यान, एका बाजूला या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता विरोधक मुद्दाम शिवसेनेला डिवचत आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे ट्विट करत म्हणाले की, तत्वासाठी सत्तेवर लाथ मारणारे माननीय बाळासाहेब ठाकरे कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.