‘एखादी नवरी घर सोडताना कसं सोंग करते तसं उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताना सोंग केलं’

अमरावती – औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे (sandipan bhumre) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (uddhav thackeray) पुन्हा एकदा टीका केली आहे. एखादी नवरी घर सोडताना कसं सोंग करते तसं यांनी वर्षा बंगला सोडताना सोंग केलं. आम्ही जेव्हा त्यांना भेटायला जायचो. तेव्हा मास्क लावून असत. आता सरकार गेलं आणि मास्कही गेला. खुर्ची गेली आणि कोरोनाही गेला. ठाकरे हे केवळ टीव्हीवर दिसायचे. टीव्ही बंद केला तर ठाकरेही दिसत नसायचे अशी टीका त्यांनी केली आहे.

संदीपान भुमरे म्हणाले, राज्यात कोरोनाचं एवढं संकट आलं. पण उद्धव ठाकरे एकाही जिल्ह्यात गेले नाही. आदित्य ठाकरे एकाही जिल्ह्यात गेले नाही. त्यांना वेळच नव्हता. अशा मुख्यमंत्र्यांचा फायदा काय? पण एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून राज्यात फिरत होते. कुणाला काय हवं नको विचारत होते. प्रत्येकाची विचारपूस करत होते. उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पूर्णपणे जाळ्यात आल्याचं लक्षात आलं, तेव्हाच आमची चलबिचल सुरू झाली.

पक्षप्रमुख जर मुख्यमंत्री होत असतील तर आपण शांत राहील पाहिजे असं एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितले. पण जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते कोणालाही भेटायचे नाही. जर मंत्र्यांना ते भेटत नसतील तर तुम्हाला भेटणं खूपच लांब राहिलं. तुम्ही फक्त संघटना वाढवण्याचं काम करा. कोणतंही काम घेऊन येऊ नका, असं उद्धव ठाकरे सांगायचे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.