शिवसेना म्हणून आम्ही 130 ते 140 जागा लढवणार; बावनकुळेंच्या वक्तव्यावर संजय गायकवाड आक्रमक

मुंबई- 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिंदे गट एकत्र मिळून ही निवडणूक लढणार आहेत. त्यात शिंदे गटाला किती जागा मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं विधान केलं आहे.
भाजपच्या प्रसिद्धी प्रमुखांची काल बैठक पार पडली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रसिद्धी प्रमुखांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलाच जाहीर केला. यावेळी ते म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवणार. त्यामुळे शिंदे गटाला फक्त 48 जागा मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिंदे गटाकडे 50 आमदारांचं बळ असतानाही त्यांची केवळ 48 जागांवर बोळवण केली जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून आता यावर भाजपच्या मित्रपक्ष आणि शिवसेना नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
संजय गायकवाड म्हणाले की, “सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा शिंदे गट नाही तर ही शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना. भाजपा-शिवसेनेची ही युती बाळासाहेबांनी केलेली आहे. त्यामुळे इतर कुठला नेता काही घोषणा करत असेल तर त्यांच्या शब्दाला काही अर्थ नाही. आमची युती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. युतीचा विषय या नेत्यांसोबत आहे.”