शिवसेनेचा हिंदुविरोधी चेहरा पुन्हा एकदा आज समोर आला; ममता-ठाकरे भेटीवरून भाजपची टीका 

मुंबई – तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जी देखील त्यांच्यासोबत आहेत. आज 1 डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी दुपारी 3 वाजता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्या भेटणार होत्या, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची भेट झाली नाही. म्हणून राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

दरम्यान, या भेटीवर आता भाजपने टीका केली आहे. भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. संजय पाण्डेय यांनी शिवसेनेला याच मुद्द्यावरून डिवचले आहे. ते म्हणाले, दुर्गापूजेवर नियमांची कठोरतामोहरम आणि ईदवर शिथिलता दाखवणाऱ्या ममता बॅनर्जी यांचे महाराष्ट्रात शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी स्वागत केले. पश्चिम बंगाल पॅटर्न महाराष्ट्रात आणण्याची उद्धवजींची योजना आहे का? शिवसेनेचा हिंदुविरोधी चेहरा पुन्हा एकदा आज समोर आला आहे अशी टीका त्यांनी केली आहे.