पोलीस आयुक्तांनी नवनीत राणांच्या आरोपांचा केला भांडाफोड ; ट्विट केला चहा पितानाचा व्हिडीओ

मुंबई : मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी केला होता. या संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला (Lok Sabha Speaker Omprakash Birla) यांनाही पत्र लिहिलं होतं. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला 24 तासात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र या प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

 

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी ट्वीट करुन खार पोलीस स्टेशनमधला सीसीटीव्ही फूटेज शेअर केलं आहे. या फूटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांच्या ताब्यात असतानाही चांगली वागणूक दिली गेल्याचं दिसत आहे.

दुसरीकडे नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी केली असून त्यामध्ये वस्तुस्थिती नाही तरीसुद्धा लोकसभा अध्यक्षांनी माहिती मागवली आहे तर ती माहिती राज्यसरकार देईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.