गाण्यावर नाच करणे असो किंवा गाणं म्हणणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दोन्ही बाजूंच्या ट्रोलर्सने समजावून घ्यावं…

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत विवाहबंधनात अडकत आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. यामुळेच या हायप्रोफाईल विवाह सोहळ्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसून येत आहे.

दरम्यान, पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं. मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात संजय राऊत यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीतील या बड्या नेत्यांविरोधात चांगलीच टीकेची झोड उठली आहे.

तर दुसरीकडे गाण्यावर नाचणे किंवा गाणे गाणे हा अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा भाग आहे. हे टीकाकारांनी समजावून घ्यायला हवं. मग ते टीकाकार दोन्ही बाजूचे का असेनात. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना देखील त्यांच्या गायकीवर अशा नेहमीच टीकांना सामोरं जावं लागतं आज तीच परिस्थिती सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यावर ओढवली आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून या सगळ्यावर भाष्य केले आहे. ‘गाण्यावर नाच करणे हे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यावर कोणीही टीका करू शकत नाही, करू नये. तुम्हाला जबरदस्ती केलेली नाहीय ते बघायची. आणि गाणं म्हणणे हे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कोणीही टीका करू शकत नाही, करू नये. तुम्हाला जबरदस्ती केलेली नाहीय ते ऐकायची’. मला आशा आहे की दोन्ही बाजूचे लोक हे समजून घेतील. असं विश्वंभर चौधरी म्हणाले आहेत.

हे देखील पहा