’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही,पण…; राजकीय भूकंपाच्या दिशेने राज्याची वाटचाल ?

Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या भाजप शिवसेना युतीत येणार असल्याच्या एका बाजूला उलटसुलट चर्चा सुरु असताना वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे खासदार संजय राऊत हे पुन्हा चर्चेत आले आहेत. राऊत यांनी सामनातील ‘रोखठोक’ या आपल्या सदरात केलेल्या दाव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊतांनी त्यांच्या रोखठोक या सदरात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा एक संदर्भ दिला आहे. यावेळी भेटीत पवारांनी केलेला एक दावा त्यांनी जनतेसमोर मांडला आहे.

राऊत म्हणतात, मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही, असं संजय राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.

आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या ईडी-सीबीआयच्या फाईली कधीच बंद होत नाहीतअसंही संजय राऊतांनी नमूद केलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या या दाव्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सोबतच जनता देखील राऊत यांना गांभीर्याने घेतेय का हे देखील पुढे स्पष्ट होईल.