‘शांतता अभ्यास सुरू आहे असं नवीन नाट्य राजभवनात सुरू’

मुंबई : राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा सत्ताधारी महाविकास आघाडीचा मानस आहे. खरतर मागील अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा निकालात काढता आला असता मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या निवडणुकीसाठी फारसे उत्साही असल्याचे दिसून आले नाही. सोबतच कोरोनाच्या स्थितीमुळे बरेच आमदार गैरहजर होते आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक घेतली तर काही दगाफटका होऊ शकतो अशी शंका आल्यानेच ती निवडणूक टळली.

या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे महाविकास आघाडीकडून सुपुर्द करण्यात आला. त्यानंतर राज्यपालांनी कायदेशीर बाबी तपासून सांगतो असे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला राज्यपालांनी सांगितले आहे.

राज्यपालांच्या या भूमिकेवर शेवसेना नेते आणि खासदार संजय राऊत प्रतिक्रिया देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जोरदार टोला लगावला आहे. राज्यपाल आपले फार अभ्यासू आहेत. त्यांना प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा लागतोय. इतका अभ्यास बरा नाही. त्या अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे. इथे मुळात लॉकडाऊन काळात अभ्यास कमी झाला आहे. आता प्रत्येक गोष्टीत अभ्यास करायला लागलात. आपल्या संविधानात काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार काम करायचं आहे. घटनेत स्पष्ट लिहिलंय की मंत्रिमंडळाच्या शिफारशी तुम्ही मान्य करायच्या आहेत, असं राऊत म्हणाले.

12 आमदारांच्या शिफारशी दिल्या त्याला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्या शिफारशी बंधनकारक आहेत. आपल्या संविधानात लिहिलं आहे. पण राज्यपालांचा अभ्यास सुरू आहे. शांतता अभ्यास सुरू आहे असं नवीन नाट्य राजभवनात सुरू आहे. आणि त्याचे पात्र जे आहे ते केवळ राज्यपालच नाहीत तर भाजपचे नेतेही त्या नाट्यात भाग घेत आहेत. आता काही दिवस नाटक चालेल. नाटक रंगू द्या. कारण आता 50 टक्के क्षमतेची आसन व्यवस्था असल्याने अशा प्रकारची नाटकं होतं असतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उद्या २७ डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. तर, २८ डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.