‘बघू सोडून गेलेल्यांपैकी कितीजण पुन्हा निवडून येतात’, संजय राऊत यांचं बंडखोर नेत्यांना आव्हान

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहेत. नुकतेच ठाकरे गटातील मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. महानगरपालिका निवडणुकांपूर्वी आणखी एका खासदाराने पक्ष सोडणं, पक्षासाठी घातक मानलं जातंय. परंतु जेष्ठ शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे मत काही वेगळेच आहे.

एकामागोमाग एक खासदारांनी जरी ठाकरे गटाची साथ सोडली, तरी हा पक्षासाठी धक्का नसेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याउलट त्यांनी पक्षातील बंडखोर नेत्यांना निवडून येण्याचे आव्हान केले आहे.

“कीर्तिकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी एक वेगळी भावना निर्माण होते. यामुळे फार काही सळसळ झाली नाही. ठीक आहे गेले. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील. आपण गेलात, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. निवडणुकांमध्ये पाहू, सोडून गेलेल्यांपैकी कितीजण पुन्हा निवडून येतात,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

“किर्तीकर आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षानं त्यांना काय दिलं नाही? पाच वेळा आमदार होते, दोन्ही मंत्रीमंडळात ते मंत्री राहिले. पक्षाकडून दोनदा त्यांना खासदारकी मिळाली. त्यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर हे कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्षासोबत आहेत. पण सर्व काही भोगलेले”, असेही त्यांनी पुढे म्हटले.

दरम्यान गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले तसेच भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर , रामदास कदम आणि मोठे संख्येने बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गजानन कीर्तिकर हे ५ वेळा आमदार आणि २ वेळा खासदार राहिले आहेत.