तपास यंत्रणा महापालिकेच्या शिपयांवरही धाड टाकतील; राऊतांचा टोला 

मुंबई – मुंबई मनपातील स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते  यशवंत जाधवांच्या   घरी आयकर विभागाकडून  (income tax raid ) छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्राप्तिकर विभागाचं पथक मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मुंबईतील घऱी पोहोचलं आहे. माझगावमधील त्यांच्या निवासस्थानी तपास सुरु आहे.

विशेष म्हणजे तपास सुरु असल्याने इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत.  दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणारी चौकशी, शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. महिन्याभरात महापालिका निवडणुका आहेत, प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे महापालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील, कारण ते खिशाला धनुष्यबाण लावतात. मराठी लोकं आहेत त्यामुळे ते लावत असतात. त्यांच्यावरही हे धाड टाकू शकतात, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

खोटे गुन्हे दाखल करतात, खोटे पुरावे तयार करतात असा आरोप संजय राऊतांनी यावेळी केला. २०२४ पर्यंत हे आम्हाला सहन करायचं आहे. महाराष्ट्रालाही सहन करायचं आहे. पश्चिम बंगाल, झारखंड. पंजाबलाही सहन करायचं आहे. २०२४ नंतर पाहूयात, असंही यावेळी त्यांनी सांगितलं.