कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात जाऊन जलसमाधी घ्या, शिंदे सरकारवर बरसले संजय राऊत

सांगली: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच उफाळला असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. कर्नाटकने कोणतेही आवर्तन जाहीर केले नसताना जत तालुक्यातील तिकोंडी तलावात पाणी सोडले आहे. तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी सोडत कर्नाटकने पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde Fadanvis Government) खोचक टोला लगावला आहे.

संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान कर्नाटककडून तिकोंडी तलावात पाणी सोडण्यात आले, यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्या पाण्यात जाऊन जलसमाधी घ्यावी, अशी खरपूस टीका केली आहे.

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणात अशाप्रकारे आक्रमण आणि अतिक्रमण गेल्या ५०-५५ वर्षांत झालं नव्हतं. त्या राज्यातला (कर्नाटक) मुख्यमंत्री अजूनही महाराष्ट्राला आवाहन देतोय. त्यामुळे चुल्लूभर पाणी में डुब मरों म्हणतात ना, तस त्या सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्या”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

“ज्या स्वाभिमानाच्या जोरावर तुम्ही शिवसेना सोडली. तो स्वाभिमान आता कुठे गेला. कर्नाटकचा मुख्यमंत्री तुमच्या सरकारच्या तोंडावर थुंकतोय. मग आता क्रांती करा ना”, असेही संजय राऊत शेवटी म्हणाले.