राहुल गांधी यांचं नेतृत्व तळपताना दिसत आहे, लोकं त्यांना स्वीकारत आहेत; संजय राऊत यांनी केले कौतुक 

नवी दिल्ली –  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray group MP Sanjay Raut) हे जम्मूमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. आज पहाटेच संजय राऊत राहूल गांधींसह यात्रेत सहभागी झाले. यात्रेत सहभागी होताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संजय राऊतांची गळाभेट घेत त्यांचे यात्रेत स्वागत केले. भाजपला डिवचण्यासाठीच ठाकरे गट भारत जोडो यात्रेत सहभागी होत असल्याची जोरदार चर्चा आहे.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले,  काँग्रेसशिवाय कोणत्याही विरोधी पक्षाची आघाडी होऊ शकत नाही. एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रश्न नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. राहुल गांधी यांचं नेतृत्व तळपताना दिसत आहे. लोकं त्यांना स्वीकारत आहेत असे कौतुकोद्गार देखील संजय राऊत यांनी राहुल गांधींविषयी काढले. याचवेळी शिवसेना जम्मू विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहे असल्याची घोषणाही राऊत यांनी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले,  राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या यात्रेने चांगला संदेश दिला आहे. देशात चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. काल तुम्ही पाहिलं असेल पठाणकोटला हजारो तरुण जमले होते. या तरुणांच्या हातात मशाली होत्या. पेटलेल्या मशाली होत्या. मशाल हे काँग्रेसचं चिन्हं नाही. ते तर शिवसेनेचं चिन्हं आहे. पण तरुणांच्या हाती या धगधगत्या मशाली पाहून मला भरून आलं, असं राऊत म्हणाले.