भाजपला चोऱ्यामाऱ्या केल्याशिवाय ही २० मतं मिळणे शक्यच नाही; संजय राऊत यांचा दावा

मुंबई – विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) १० जागांसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतांची जुळवाजुळव केली जात आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी कोण कसं मतांचं गणित जुळवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतच कुरघोड्या सुरू झाल्या आहेत.

दरम्यान,  विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडे (BJP) चार उमेदवारांना निवडून आणल्यानंतर फक्त दोन मतं अतिरिक्त उरतात. तरीही भाजपने पाचवा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. हा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला २० पेक्षा अधिक मतांची गरज आहे. ही मतं भाजप (BJP) कुठून आणणार आहे? त्यासाठी भाजपकडून आमदारांची फोडाफोडी, दहशत आणि दबावाचा वापर होईल. भाजपला चोऱ्यामाऱ्या केल्याशिवाय ही २० मतं मिळणे शक्यच नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी केले.

भाजप निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक या अफवा पसरवत आहे. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. कोणी कोणाला मतदान करायचे, यासंदर्भातही निर्णय झाले आहेत. त्यामुळे भाजपने कितीही अफवा पसरवल्या तरी विधानपरिषद निवडणुकीत त्यांना यश येणार नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.