संजय राऊत यांनी दिले राजकीय निवृत्तीचे संकेत; आदित्य ठाकरेंकडे जाणार पक्षाची धुरा ?

 Mumbai –   वादग्रस्त वक्तव्ये करून राहणारे खासदार संजय राऊत यांनी आता चक्क राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.   “शिवसेनेतल्या आमच्या सारख्या लोकांनी आता पुढच्या सीटवरुन मागच्या सीटवर जायला हवं आणि शिवसेना नेतृत्वाची कमान पुढच्या पिढीकडे सोपवायला हवी. असं म्हणत राऊत यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत.महाराष्ट्र टाइम्सनं घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.

ते पुढे म्हणाले की, “आदित्यला युवासेना सांभाळण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी ठाकरे सरकारमध्ये मंत्री म्हणून खूप उत्तम काम केलंय. तरुण नेतृत्वाकडे शिवसेना पक्षाची कमान जाताना मला आदित्य ठाकरेंमध्ये ते सर्व गुण दिसतात.”

“आता कुठेतरी आमच्या सारख्या लोकांनी मागे जायला हवं आणि पुढच्या पिढीकडे ही कमान सोपवायला पाहिजे. त्याच दृष्टीने मी आदित्यकडे पाहतो. आम्ही आणखी किती वर्ष काम करणार? कधीतरी आम्हाला निवृत्त व्हावे लागेल. योग्य वेळी निवृत्त व्हायला हवं. आम्ही निवृत्त होताना तरुण नेतृत्वाच्या हाती शिवसेना पक्षाची धुरा जायला हवी आणि आदित्य ठाकरेंमध्ये मला सगळे नेतृत्वगुण दिसतात,” असं म्हणत संजय राऊतांनी निवृत्तीचेही संकेत दिले.