जनता स्वयंभू नेत्यांनाच मान देते, इतरांनी शेंदूर फासलेल्या दगडांना नव्हे; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Mumbai: मुंबईत बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी राजकीय नेत्यांची नावं उच्चारत संबंधित नेत्यांनी तुम्ही काय सल्ला द्याल?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारला. त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या नेत्यांना मौलिक सल्ला दिला. परंतु, उद्धव ठाकरे यांचे नाव येताच राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘उद्धव ठाकरेंना काय सांगणार मी? ते स्वयंभू आहेत’. आदित्य ठाकरेंबाबतीतही त्यांनी हेच विधान केले.

आता यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. हो आम्ही स्वयंभूच आहोत ना. जी स्वयंभू दैवतं असतात त्यांच्या मागेच जनता जाते. इतर कोणी जे काही दगडांना शेंदूर फासतात आणि आता या दगडांना देव म्हणा सांगतात, त्यांचं लोक ऐकत नाहीत. या शेंदूर फासलेल्या दगडांना लोक वाकून नमस्कार करत नाहीत. स्वयंभू देवता आणि नेत्यांनाच तो श्रद्धेचा मान मिळतो. तो मान ठाकरे कुटुंबीयांना दिला जातो. याच्यामुळे कोणाची पोटदुखी असेल तर त्यांनी सांगावं, आमच्याकडे त्यावर उपचार आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.