‘ते जे काय सांगत आहेत, ते आम्ही कष्टाच्या पैशातून घेतलं आहे; आम्ही कधीही गुडघे टेकणार नाही, झुकणार नाही’ 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराच्या विरोधात ईडीने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे.  यातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर ईडीने कारवाई केली होती. यानंतर आता  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने (ED)  टाच आणलीय. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय.

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे समजते. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर (shridhar Patankar)  यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, या कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटू लागले असून संपूर्ण महाविकास आघाडी आता राऊत यांचा बचाव करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला विरोधक आक्रमक झाले असून राऊत यांच्या अटकेची मागणी करत आहेत. दरम्यान,  खासदार संजय राऊत (sanjay raut)   यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला कारवाईचं आश्चर्य वाटत नाही. अशा कारवाईने शिवसेना किंवा संजय राऊत खचले आहेत असं वाटेल, पण सूडाच्या कारवाया, असत्यासमोर आम्ही कधीही गुडघे टेकणार नाही, झुकणार नाही.

आज जे ते काय सांगत आहेत, ते आम्ही कष्टाच्या पैशातून घेतलं आहे. घर असेल, गावची लहानची जमीन असेल, 2009 मध्ये घेतलीय. भाजपचे नाचे जे नाचतायत ना, हा राजकीय दबाव आहे, एक रुपया जरी भ्रष्टाचाराचा, चुकीचा पैसा माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या खात्यावर आला असेल तर मी संपूर्ण संपत्ती भाजपच्या खात्यावर जमा करायला तयार आहोत.

भाजप (BJP)  हे भिकारी लोक आहेत. यांच्याकडे काही नाही, यांचे जे देणगीदार आहेत त्यांची चौकशी ईडीने करायला हवी. मात्र आमच्यासारख्या मराठी मध्यमवर्गीय माणसांवर कारवाई होतेय. पण आम्हाला काही फरक पडत नाही, अशा कारवाया करत राहायला हवं, महाराष्ट्रतील जनतेला हे कळायला हवं कशा कारवाया सुरु आहेत.