आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे; राऊतांनी राज्यसभेची चुरस वाढवली

मुंबई : महापालिका निवडणुकीआधी राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना खुले पत्र लिहिले आहे. या पत्रातून संभाजी राजे यांनी सर्वच पक्षातील आमदारांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपल्याला मदत करावी असे आवाहन केले आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला  राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. शिवसेनेच्या घोषणेने संभाजीराजेंना मोठा धक्का बसला आहे.कारण राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी सर्वपक्षीयांनी मला मदत करावी, असं आवाहन मागील आठवड्यात संभाजीराजेंनी केलं होतं. त्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिसाद दिला होता. पण मंत्री परब यांनी राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार असल्याची घोषणा करून संभाजीराजेंची राज्यसभेची वाट बिकट केली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय. भ्रष्टाचारातून पैसा…त्यातून घोडेबाजार! हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी. आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे.”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.