‘सर्व संस्थाचालकांनी कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श घ्यावा’

पुणे : पूर्वी शिक्षणाला फार किंमत होती. कारण आपला समाज अशिक्षित होता. प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे ही कर्मवीर आण्णांची इच्छा असल्यामुळे गोरगरिबांसाठी त्यांनी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे गावखेड्यातील समाजाचा प्रत्येक घटक शिक्षणामुळे मुख्य प्रवाहात आला. त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श आजच्या सर्व शिक्षण संस्थाचालकांनी घेतला पाहिजे. ‘सक्तीचे आणि मोफत शिक्षण ही समाजाची गरज आहे. परंतु आज सगळीकडे शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. शिक्षण विकत घेण्याची आणि देण्याची स्पर्धा सुरू आहे. कर्मवीरांच्या जयंतीच्या निमित्ताने गरजूंना सरसगट शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे… असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

कर्मवीर अण्णांच्या शिक्षण चळवळीचा आदर्श लोकांना कळण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सक्तीचे आणि मोफत शिक्षणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संभाजी ब्रिगेड भविष्यात लोकांच्या हक्कासाठी चांगल्या पद्धतीने काम करेल हीच खरी आदरांजली असेल असे मत शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी व्यक्त केले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वारगेट येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, सचिव संदीप कारेकर आदी उपस्थित होते.