पृथ्वी शॉ वर हल्ला करणाऱ्या महिलेला मुंबई पोलिसांकडून अटक, रस्त्यात केली होती मारहाण

Mumbai: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यावर मुंबईत हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. पृथ्वी शॉवर हल्ला करणारी ब्लॉगर आणि यूट्यूबर सपना गिल (Sapna Gill) हिला पोलिसांनी अटक केली आहे. ओशिवरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटकेनंतर सपना गिलचे मेडिकलही करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सपना गिलला आता शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. सध्या आरोपीच्या वतीने कोणताही क्रॉस एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलबाहेर पृथ्वी शॉची कार समजून त्याच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी बुधवारी (१५ फेब्रुवारी) ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पृथ्वी शॉचा मित्र आशिष सुरेंद्र यादव याने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या गाडीवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी गाडीचा पाठलाग करून पैसे न दिल्यास खोटा गुन्हा दाखल (Prithvi Shaw Selfie Controversy) करण्याची धमकी देण्यात आली होती.

या प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असतानाच पृथ्वी शॉचा भर रस्त्यात एका महिलेला धक्काबुक्की देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ आणि त्या तरुणी मध्ये (Prithvi Shaw Fight With Girl) बाचाबाची झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. ही तरुणी आणखी कोण नसून सपना गिल होती. तिनेच गाडी थांबवून पृथ्वी शॉला पैसे मागितले होते आणि पैसे न दिल्यास खोटे आरोप करुन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.