फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातच नाना पटोलेंनी पाडले भाजपला खिंडार…

नागपूर : राज्यात महापालिका निवडणूक येऊ घातल्या आहेत अशात सर्वच पक्षांनी पक्षवाढीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला पेव फुटला आहे. काठावर असलेले नेते पटापट उड्या मारताना दिसत आहेत. नागपूर देखील या राजकारणात मागे दिसत नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमपीच असणाऱ्या नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे.

नागपूरमधील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी उपमहापौर सतीश होले यांनी आज भाजपला जबर धक्का देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे भाजपसह इतरांच्याही भुवया उंचावल्या. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होले यांनी आज कॉंग्रेसचा हात धरला. त्यानंतर आगे आगे देखो होता है क्या, अशी प्रतिक्रिया पटोलेंनी दिली.

शहरातील सोमवारी क्वार्टरमधील एका उद्यानात हा पक्षप्रवेशाचा सोहळा थोड्या वेळापूर्वी पार पडला. याबाबत नाना पटोले यांना विचारले असता, ही तर आता सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या.. यापुढे नागपूरकरांना भाजपमधील मोठमोठ्या नेत्यांचे कॉंग्रेस प्रवेश बघायला मिळतील. याचे कारण म्हणजे भाजपने नागपूरकरांनी दिलेली आश्वासने तर पूर्ण केलीच नाहीत, पण त्यांच्याच कार्यकर्त्यांना दिलेले शब्ददेखील पाळले नाहीत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आता त्यांच्यावर चिडलेले आहेत आणि ही चीड महानगपालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला बघायला मिळणार आहे, असे ते म्हणाले.